राहुरी येथील न्यायालयात वकिली काम करणाऱ्या आढाव दांपत्याचे अपहरण करून दाम्पत्याचा हत्या केल्याची घटना घडली असून राहुरी तालुक्यातील उंबरे या गावातील अमरधाममध्ये विहिरीत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
राहुरी न्यायालयात वकिली करणारे दांपत्य राजाराम आढाव व मनीषा राजाराम आढाव हे गुरुवारी राहुरी न्यायालयातून अहमदनगर न्यायालयात कामकाज पाहण्यासाठी जातो असे सांगून गेल्यानंतर ते पुन्हा कोणाला दिसले नाही . रात्री राहुरी पोलीस गस्त घालत असताना राहुरी न्यायालयात परिसरात एका फोर्ड फियास्टा गाडी जवळ काही अज्ञात व्यक्ती दिसले. पोलिसांची गाडी पाहतच ते एक डस्टर गाडी मधून मल्हारवाडी रोडच्या दिशेने सुसाट वेगाने पसार झाले होते.
आढाव दांपत्य देखील मिळून येत नसल्याने पोलिसांनी तात्काळ त्यांचा शोध सुरु केला होता. एलसीबी व स्थानिक पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला.
आज शुक्रवारी रात्री आढाव दांपत्याचे उंबरे येथील अमरधाम येथील विहिरीत मृतदेह आढळून आले. दगडाने बांधलेल्या अवस्थेत हे मृतदेह वर काढण्यात आले. नेमकी आढाव दांपत्याची हत्या कशातून झाली हे अद्याप समजले नसले तरी पोलिसांना आरोपींचा सुगावा लागल्याचे चर्चेतून समजते.
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, श्रीरामपूर उपविभागिय पोलीस डॉ. बसवराज शिवपुजे, राहुरी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहिरे, पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव आदिंसह एलसीबी व राहुरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी उंबरे येथे उपस्थित आहेत.