नगर शहर विधानसभा मतदारसंघात बोगस मतदार नोंदणीचा स्कॅम झाला असल्याचा शहर महाविकास आघाडीचा आरोप ;
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पुराव्यांसह केली लेखी तक्रार दाखल
प्रतिनिधी : नगर शहर विधानसभा मतदारसंघात मतदारांची दुबार नाव नोंदणी करत आगामी विधानसभा निवडणूक मतदान दिवशी बोगस मतदान बूथ कॅप्चरिंग करत घडवून आणण्यासाठी बोगस मतदार नोंदणीचा मोठा स्कॅम झाला असल्याचा खळबळजनक गंभीर आरोप शहर महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आला आहे. याबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेनेच्या संयुक्त शिष्टमंडळाच्या वतीने लेखी हरकत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, नगर भागाचे प्रांताधिकारी यांच्याकडे घेण्यात आली आहे. खा. डॉ. निलेश लंके यांचे याबाबत हरकत घेणारे लेखी पत्र यावेळी शहर महाविकास आघाडीने प्रशासनाला दिले आहे.
महाआघाडीच्या संयुक्त शिष्टमंडळाने याबाबत प्रांताधिकारी सुधीर पाटील यांची समक्ष भेट घेत सुमारे अर्धा तास यावर विविध पुरावे सादर करत जोरदार हरकत घेतली आहे. यावेळी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, अल्पसंख्यांक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, राष्ट्रवादी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष निलेश मालपाणी आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
घेण्यात आलेल्या लेखी हरकतीमध्ये म्हटले आहे की, नगर शहर विधानसभा मतदार यादी मध्ये सुमारे चोवीस ते पंचवीस हजार दुबार नावे आहेत. यामध्ये मयत व्यक्तींची नावे जाणीवपूर्वक वगळण्यात आली नाहीत. नगर शहर व लगतच्या राहुरी नगर, श्रीगोंदा नगर, पारनेर नगर या मतदारसंघांमध्ये समाविष्ट असणाऱ्या नावांची नगर शहरात दुबार नोंदणी करण्यात आली आहे. सदर दुबार व मयत मतदारांची नावे ही काही राजकारणी लोकांनी काही अधिकारी, बीएलओंना हाताशी धरून जाणून बुजून आपल्या बाजूने बोगस मतदान घडवून आणण्या करिता आहे समाविष्ट केली आहेत. शहर मतदारसंघाची मतदान यादी ही दोष रहित होणे अत्यंत गरजेचे आहे.
पुढे म्हटले आहे की, निवडणूक आयोगाने नेमलेले बीएलओ हे ज्या मतदान केंद्रात राहतात त्या ठिकाणीचे मतदान केंद्र वगळून त्यांना दुसरे केंद्र देण्यात यावे. 18 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या काही मतदारांच्या दाखल्यामध्ये खाडाखोड, फेरफार करून त्यांना 18 वर्षांचे पुढे दाखवून त्यांची नावे समाविष्ट केली आहेत. पारदर्शी निवडणूक प्रक्रिया राबवणीच्या दृष्टीने याबाबत चौकशी करुन कारवाई करण्यात यावी. हरकतीची प्रत राज्य व केंद्रीय निवडणूक आयुक्तांना देखील पाठवण्यात आली आहे. याबाबत उचित कार्यवाही न झाल्यास निवडणूक प्रशासना विरोधात मे. न्यायालय यांच्याकडे दाद मागितली जाईल असा इशारा शहर महाविकास आघाडीने प्रशासनाला दिला आहे.