मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत मशिदींवरील भोंग्यांचा उल्लेख करत 4 तारखेपासून ऐकणार नाही, असा इशारा राज्य सरकारला दिला आहे. राज ठाकरेंच्या या भूमिकेवर ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मशिदींवरील भोंगे उतरविण्याने हिंदुत्वाचे सर्वाधिक नुकसान होईल, अशी स्पष्ट भूमिका आनंद दवे यांनी घेतली आहे.
भोंगे उतरवणे वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या काळात सुद्धा शक्य झालं नव्हतं. भोंगे उतरवण्याने सर्वाधिक नुकसान हिंदुत्वाचं होईल. आमची भूमिका 3 तारखेला नगर मेळाव्यात मांडू. प्रत्येक गावाची जत्रा, उरूस, ग्राम दैवत यात्रा, गणपतीचे मिरवणूक सहित 12 दिवस, नवरात्रीचे 10, शिवजयंती, संभाजी महाराज जयंती, बाबासाहेब आंबेडकर जयंती, प्रत्येक जातीच्या युगपुरुषांचे दिवस, त्यांच्या यात्रा, पाडवा यात्रा, दिवाळी पहाट, दहीहंडी हे सगळंच संकटात येईल”, अशी भूमिका आनंद दवे यांनी मांडली.
रस्त्यावर नमाज पठण चूकच मग गणपती मंदिर, मांडव, उत्सव, मांडवात होणाऱ्या आरती, त्यापण रस्त्यावरच होत असतात. मिरवणूक, दांडिया यांच काय करणार? स्पिकर खाली आलेच पाहिजेत, तर मग हिंदू उत्सवातले स्पिकर काय करणार?”, असे प्रश्न आनंद दवे यांनी उपस्थित केले.






