Sunday, July 13, 2025

उपसरपंचाकडून विकासनिधीसाठी लाच… सरपंच पत्नीसह पतीला ५० हजारांची लाच घेताना अटक

छत्रपती संभाजीनगर : ‘पैसे घेऊन चहा प्यायला या’ असा कॉल करून उपसरपंचाकडून विकासनिधीसाठी लाच घेणाऱ्या टाकळीमाळी ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच दाम्पत्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) रंगेहाथ पकडले गेले. सरपंच ज्योती आनंद गवळी (२६) व तिचा पती आनंद रमेश गवळी (३२), अशी आरोपींची नावे आहेत. गावाच्या विकासासाठी मंजूर ३ लाखांच्या निधीसाठी ५० हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने मंगळवारी दुपारी ३ वाजता गवळी दाम्पत्याला त्यांच्याच घरातून अटक केली.

४३ वर्षीय तक्रारदार हे ग्रुप ग्रामपंचायत टाकळीमाळी येथे उपसरपंच आहेत. ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत हुसेनपूर गावासाठी पंधराव्या वित्त आयोगातून ३ लाखांचा विकासनिधी मंजूर झाला होता. उपसरपंच सातत्याने गवळी दाम्पत्याकडे तो निधी देण्यासाठी मागणी करत होते. आनंदने त्यांना ५० हजार रुपयांची लाच मागितली. यामुळे संतप्त उपसरपंचाने त्याची थेट एसीबी अधीक्षक संदीप आटोळे यांच्याकडे तक्रार केली.

गवळीने मंगळवारी उपसरपंचांना पैशांसाठी पुन्हा कॉल केला. ‘पैसे घेऊन चहा प्यायला घरीच या’ असे सांगितले. ही बाब कळताच निरीक्षक विजयमाला चव्हाण, अंमलदार राजेंद्र सिनकर, विलास चव्हाण, चांगदेव बागूल यांनी आरोपीच्या घरासमोर सापळा रचला. तक्रारदार पंचासह घरात गेले. चहा पिऊन झाल्यावर ज्योतीने ५० हजार रुपये स्वीकारताच घराबाहेर दबा धरून बसलेल्या पथकाने आत प्रवेश करत दोघांना अटक केली. ज्योती व आनंद दोघेही बारावी उत्तीर्ण असून, ज्योती गावाची तरुण सरपंच ठरली होती. मात्र, पैशांच्या लालसेपोटी थेट तुरुंगात ठाण्याची वेळ दोघांवर आली. करमाड पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles