महाराष्ट्रात नोव्हेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय क्षेत्रात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. त्यातच विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे मोठी खेळी खेळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील बी आर एस पक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात विलीन होणार आहे.
येत्या ६ तारखेला हजारोच्या संख्येने पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात शरद पवारांच्या उपस्थितीत बी आर एसचे कार्यकर्ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. महाराष्ट्रातील संपूर्ण कार्यकारणी आणि पदाधिकारी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहेत. बीआरएसचे महाराष्ट्र मुख्य समन्वयक बाळासाहेब देशमुख यांनी यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहेविधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्यास बोटावर मोजण्या इतके दिवस राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर मोठ्या उलथा पालथी राजकीय वर्तुळात पाहायला मिळणार आहे. याचीच एक झलक ६ ऑक्टोबर रोजी पाहायला मिळेल. प्रदेश बीआरएसची कार्यकारणी, पदाधिकारी, कार्यकर्ते पवारांच्या उपस्थित राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील. त्यामुळे राजकीय वर्तुळातील ही मोठी घटना आहे.
तेलंगणातील भारत राष्ट्र समितीचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मोठ्या थाटात राज्यात बीआरएस वाढवण्यासाठी डाव टाकला होता. लोकसभा निवडणुकीपूर्वी नागपूरमध्ये पक्ष कार्यालय देखील सुरु केलं होतं. पण, काही दिवसातच पक्षाला आपला गाशा गुंडाळावा लागला आहे. बीआरए हा तेलंगणातील मोठा पक्ष आहे. पण, गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत पक्षाची मोठी पिछेहाट झाली आहे.
महाराष्ट्रात के चंद्रशेखर राव यांना मोठा धक्का बसला आहे. काही महिन्यातच राज्यातील नेत्यांनी त्यांची साथ सोडली आहे. त्यामुळे बीआरएसचा प्रभाव कमी होत असल्याचं दिसत आहे. दुसरीकडे, विधानसभेपूर्वी शरद पवारांची ताकद वाढताना दिसत आहे.