मेहेकर तालुक्यातील बाभुळखेड गावातील डीपी व सडलेले पोल बदलण्याची मागणी ग्रामस्थ करत होते. यासाठी विद्युत वितरण कार्यालयाच्या वारंवार चकरा मारूनही काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर संतप्त झालेल्या बाभुळखेड येथील सरपंच शिवशंकर गायकवाड यांनी चक्क विद्युत वितरण कंपनी कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या टॉवरवर चढून “शोले” स्टाईल आंदोलन सुरु केले.
बाभुळखेड येथील विद्युत डीपी गेल्या ९ महिन्यांपासून नादुरुस्त असून गावातील नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच गावातील काही विद्युत पोलची अत्यंत दुरावस्था झाली आहे. अनेक पोल पूर्णपणे सडले आहेत व पोलच्या तारा खाली लोंबकाळत आहेत. यामुळे अपघात होऊन जिवितहानी होण्याचाही धोका निर्माण झाला.
म्हणूनच हे पोल बदलून नविन पोल बसवावे व नविन डीपी बसवीण्याची मागणी वारंवार उपविभागीय अभियंत्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती. त्यानंतर सरपंच गायकवाड व गावकऱ्यांनी विद्युत वितरण कार्यालयात अनेक चकरा मारल्या. परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते.
शेवटी गावचे सरपंच शिवशंकर गायकवाड यांनी महावितरण कार्यालयाच्या पाठीमागील टॉवरवर चढून आंदोलन सुरु केले. या शोले स्टाईल आंदोलनामुळे महावितरण कार्यालयात एकच तारांबळ उडाली. अखेर उपविभागीय अभियंत्यांनी लेखी आश्वासन दिल्या नंतर सरपंच खाली उतरले व आंदोलन मागे घेण्यात आले