नगर – रात्रीच्या वेळी घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत घरातील ५६ हजार रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना नगर तालुयातील हिवरे बाजार गावच्या शिवारात पोखरण वस्ती येथे गुरुवारी (दि.७) सकाळी उघडकीस आली. याबाबत माजी सैनिक अशोक भाऊसाहेब ठाणगे (वय ३९, रा. हिवरे बाजार शिवार, ता.नगर) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे हिवरे बाजारगावच्या शिवारात पोखरण वस्ती परिसरात घर आहे. ते व त्यांचे कुटुंबीय बुधवारी (दि.६) रात्री घराच्या दरवाजाला आतून कडी लावून झोपले होते. रात्री १२ ते गुरुवारी (दि.७) सकाळी ६ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा कशाच्या तरी सहाय्याने उचकटून आत प्रवेश केला.
घरात सर्वत्र उचकापाचक करून घरातील पत्र्याच्या पेटीत ठेवलेली रोख रक्कम व त्यांच्या आईचे सोन्या चांदीचे दागिने असा सुमारे ५६ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. गुरुवारी सकाळी ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी नगर तालुका पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. दुपारी अशोक ठाणगे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध भा.द. वि. कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तपास मपोना. गायत्री धनवडे या करीत आहेत.