Friday, June 14, 2024

विखे यांचे फेक अकाउंट तयार करून ज्येष्ठ कलावंत बाबासाहेब सौदागर यांची हजारो रुपयांची फसवणूक ! पोलिसात तक्रार दाखल

श्रीरामपूर: येथील प्रसिद्ध चित्रपट गीतकार तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक सेलचे खानदेश विभागीय अध्यक्ष बाबासाहेब सौदागर यांची प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स चे अध्यक्ष राजेंद्र विखे पाटील यांच्या नावाने फेक फेसबुक अकाउंट तयार करून 65 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे.

याबाबत सौदागर यांचे जावई यांनी पुणे सायबर पोलीस येथे फिर्याद दाखल केली आहे. याबाबतची माहिती अशी की, येथील चित्रपट गीतकार बाबासाहेब सौदागर यांना राजेंद्र विखे यांच्या नावाने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आली सौदागर यांनी ती स्वीकारली. नंतर काही दिवसांनी विखे यांनी सौदागर यांना त्यांचा व्हाट्सअप नंबर मागितला व मेसेंजर वर चॅटिंग करत विखे यांनी सांगितले की, संतोष कुमार नावाचे माझे आर्मी ऑफिसर मित्र आहेत. त्यांची ट्रान्सफर झाल्याने त्यांना घरातील काही वस्तू द्यायच्या आहेत. संतोष कुमार यांचा नंबर मी तुम्हाला पाठवतो, असे सांगून त्यांनी संतोष कुमार यांचा नंबर पाठवला. विखे पाटील यांच्यासारख्या एवढ्या मोठ्या माणसाने आपल्याला नंबर पाठवला आहे, त्यामुळे सौदागर यांनी विश्वास ठेवत संतोष कुमार यांना संपर्क साधला व संतोष कुमार यांच्याशी चर्चा होऊन संतोष कुमार यांनी फर्निचरचे 75 हजार रुपये द्या असे सांगितले, तडजोडीनंतर पन्नास हजार रुपयांना ते फर्निचर द्यायचे ठरले.

सौदागर यांनी त्यांचे जावई मोहित तावरे हे पुण्यात आयटी इंजिनिअर आहेत, त्यांना सांगितले. त्यांनी संतोष कुमार यांना अगोदर दहा हजार रुपये पाठवले. परंतु ते मिळाले नाही असं संतोष कुमार यांनी सांगितल्यानंतर पुन्हा दहा हजार रुपये पाठवले. ते मिळाल्याचे संतोष कुमार यांनी सांगितले.

दरम्यान संतोष कुमार यांनी सांगितले की, गाडीमध्ये फर्निचर भरून गाडी पाठवली आहे. समनापुर(ता. संगमनेर) मध्ये गाडी आली आहे, मात्र 32 हजार रुपये पाठवा तरच गाडी पुढे येईल. आर्मीचे रुल्स खूप कडक असतात, गाडीला तिथपर्यंतचा रूट दिलेला आहे. पुढे गाडी तशी येणार नाही. म्हणून सौदागर यांनी राजेंद्र विखे पाटील यांना फोनवरून संपर्क साधत झालेली घटना सांगितली.

विखे यांनी सौदागर यांना सांगितले की, माझं तुमच्याशी कधीही बोलणं झालं नाही. मी तुम्हाला कुठलाही एसएमएस केलेला नाही. त्यानंतर सौदागर यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी पुणे येथील कात्रज पोलीस स्टेशनला याबाबत गुन्हा दाखल करण्याचे सांगितले. त्यानुसार भारती विद्यापीठ कात्रज येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेंद्र विखे पाटील यांनी देखील केली तक्रार

दरम्यान यासंदर्भात राजेंद्र विखे पाटील यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता सचिन गोर्डे यांनी सांगितले की, संबंधित बनावट फेसबुक अकाउंट संदर्भात पूर्वीच पोलिसात तक्रार दिलेली आहे. ते अकाउंट देखील बंद आहे. कुणीही फेसबुक वरून फ्रेंड रिक्वेस्ट आल्यास फसवणुकीला बळी पडू नये.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles