अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी
मतदार यादीत आपल्या नावाची खात्री करावी — उप विभागीय अधिकारी सुधीर पाटील यांचे आवाहन
अहमदनगर :- मा.भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी 1 जुलै, 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर केल्यानुसार 225- अहमदनगर शहर विधानसभा मतदार संघातील मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय तसेच संबंधित मतदान केंद्रावर प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही याची खात्री करण्याचे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
मा.भारत निवडणूक आयोग जाहीर केलेल्या छायाचित्र मतदार याद्यांच्या संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रमानुसार 6 ऑगस्ट, 2024 रोजी एकत्रीकृत प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी करणे, 6 ते 20 ऑगस्ट दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी, 10, 11, 17 व 18 ऑगस्ट, 2024 रोजी प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष मोहिमांच्या आयोजनाचा कालावधी असुन 29 ऑगस्ट रोजी दावे व हरकती निकाली काढण्यात येणार आहेत. 29 ऑगस्ट, 2024 रोजी अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी मागणे तसेच डाटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणी याद्यीची छपाई करण्यात येणार असुन 30 ऑगस्ट, 2024 रोजी अंतिम यादीची प्रसिद्धी करण्यात येणार आहे.
1 जुलै ते 1 ऑक्टोबर, 2024 दरम्यान 18 वर्षे पुर्ण करणाऱ्या मतदारांनी नाव नोंदणीसाठी नमुना 6 भरुन द्यावा. नाव, पत्ता बदल करणे व स्थलांतर यासाठी नमुना 8 भरुन द्यावा. मयत, दुबार, स्थलांतरीत मतदारांची नावांची वगळणी करण्यासाठी नमुना 7 भरुन द्यावा. हा नमुना भरण्याची सुविधा भारत निवडणूक आयोगाच्या https://voters.eci.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच मतदार यादीत आपले नाव तपासण्यासाठी www.ceo.maharashtra.gov.in आणि www.electoralsearch.eci.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. या शिवाय नागरीकांना व्होटर्स हेल्पलाईन मोबाईल अॅप देखील नाव नोंदणी व नाव शोधण्यासाठी उपलब्ध आहे. मतदार नोंदणीचे अर्ज जिल्हयातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय या ठिकाणी देखील उपलब्ध असुन नागरीकांना कोणतीही अडचण असल्यास मतदार मदत क्रमांक 1800221950 वर संपर्क साधण्याचे आवाहनही श्री पाटील यांनी यावेळी केले.
225-अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये 286 मतदान केंद्रे होते. यामध्ये वाढ करण्यात येऊन 11 नवीन मतदान केंद्रे प्रस्तावित करण्यात आली असुन एकुण मतदान केंद्रांची संख्या 297 एवढी झाली आहे. 21 मतदान केंद्राच्या इमारतीमध्ये बदल करण्याचे प्रस्तावित असुन 9 मतदान केंद्राच्या नावात बदल करणे प्रस्तावित करण्यात आले असल्याची माहितीही श्री पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.