एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो. याबाबत तिन्ही पक्षांचं एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. बऱ्याच काळापासून आमदार मंत्रीपद मिळण्याची वाट पाहत आहेत. मात्र अद्याप राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाहीत. त्यामुळे काही आमदार नाराज असल्याची माहिती आहे.
त्यामुळे आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीआधी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा निर्णय महायुतीतील प्रमुख नेते घेऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.याचबद्दल बोलताना शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले की, ”विधानसभा अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पाहिजे. अनेक दिवसांपासून हा विस्तार रखडलेला आहे.”सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिदे गटातून आशिष जैस्वाल, संजय शिरसाट, भरत गोगावले यांची मंत्रीपदी वर्णी लागू शकते. याशिवाय लोकसभा निवडणुकीत मुंबई दक्षिणमधून पराभूत झालेल्या यामिनी जाधव आणि लता सोनावणे यांनाही मंत्रिपद मिळू शकतं.अजित पवार गटाकडून इंद्रनील नाईक, अण्णा बनसोडे, संग्राम जगताप यांना मंत्रिपद मिळू शकतं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच भाजपकडून आमदार नितेश राणे, माधुरी मिसाळ, मनीषा चौधरी, संजय कुटे, राणाजगजित सिंह पाटील आणि देवयानी फरांदे यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.