राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय नेते ठिकठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर गृह खात्याने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील सर्व पोलिसांच्या सुट्ट्यात रद्द करण्यात आल्यात महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलंय. चौथ्या टप्प्यासाठी सोमवारी १३ मे रोजी मतदान होणार आहे. यानंतर पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेला सुरुवात होईल. मुंबईतील ६ लोकसभा मतदारसंघात २० मे रोजी मतदान होईल.
यामध्ये मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण मतदारसंघाचा समावेश आहे. यापार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच पोलिसांची कमतरता पडू नये, यासाठी गृह खात्याने सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द केल्याची माहिती आहे.
यामध्ये साप्ताहिक सुट्ट्या आणि अन्य रजेचा देखील समावेश आहे. फक्त वैद्यकीय रजेला यामधून वगळण्यात आलं आहे. १८ मे ते २० मे दरम्यान मुंबईतील सर्व पोलिसांच्या साप्ताहिक व इतर रजा रद्द राहतील, असे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती आहे.