महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती या संघटनेचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा ठपका ठेवून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. या घटनेने शिक्षक वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यांच्या विरोधात कुरझडी येथील भाजप नेते प्रभाकर चौधरी यांनी तक्रार केली होती. तसेच या तक्रारीला भाजपचे लोकसभेचे उमेदवार असलेले खा.रामदास तडस यांनी अनुमोदन दिले होते.
विजय कोंबे यांनी काँग्रेसचे उमेदवार अमर काळे यांचा समाजमाध्यमातून प्रचार केल्याचा प्राथमिक ठपका आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्याचा आरोप आहे. व्हॉट्सॲपवर कोंबे यांनी ही टीका फॉरवर्ड केली. तसेच ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली होती. त्यावेळी मोदी बसलेले होते. या चित्रावर सुद्धा कोंबे यांनी टिका केल्याचा आरोप आहे.
या आरोपाच्या आधारे कोंबे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी झाली. त्याची तात्काळ दखल घेत वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुक्रवारी रात्री देवळी येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक असलेल्या विजय कोंबे यांच्यावर निलंबनाचा बडगा उगारला. मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी शनिवारी सायंकाळी यास दुजोरा दिला. आचारसंहितेच्या तरतुदीनुसार ही कारवाई तात्काळ करण्यात आली.