मुंबई महानगरपालिका निवडणुकीत बोगस जात प्रमाणपत्र वापरल्याचा ठपका ठेवत कोर्टाने भाजपचे नेते मुरजी पटेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मुंबईच्या शाहूनगर पोलिसांनी मुरजी पटेल यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल केला आहे. लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. या घटनेनं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
भाजप नेते मुरजी पटेल यांनी २०१७ साली अंधेरी पूर्व प्रभाग क्रमांक ८१ मधून महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती. निवडणूक लढताना त्यांनी खोटे जात प्रमाणपत्र वापरले असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. याविरोधात कोर्टात याचिका देखील दाखल करण्यात आली होती.
दरम्यान, मुरजी पडेल यांनी निवडणुकीत जातीचे बोगस प्रमाणपत्र वापरले कोर्टात सिद्ध झाले. इतकंच नाही तर, मुरजी पटेल यांनी निवडणूक अर्जासोबत जात प्रमाणपत्राच्या वैधतेसाठी वडिलांच्या शाळा सोडल्याचा दाखला व जन्म प्रमाणपत्र दिले होते, ते देखील बनावट असल्याचं सिद्ध झालं आहे.त्यामुळे मुरजी पटेल यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करा, असे आदेश वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयाने पोलिसांना दिले. दरम्यान, कोर्टाच्या आदेशानंतर मुंबईच्या शाहूनगर पोलिसांनी मुरजी पटेल यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल केला आहे. लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.