नवी दिल्ली – अयोध्येतील राम मंदिरातील अभिषेक सोहळ्यामुळे देशभरातील सर्व केंद्र सरकारी कार्यालये २२ जानेवारी रोजी अर्ध्या दिवसासाठी बंद राहणार आहेत. कार्मिक मंत्रालयाने गुरुवारी एका आदेशात ही माहिती दिली.
राम मंदिराच्या गर्भगृहात राम लल्लाच्या नवीन मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी होणार आहे. ‘‘अयोध्येतील राम लल्लाचा अभिषेक सोहळा २२ जानेवारी रोजी संपूर्ण भारतात साजरा केला जाईल. कर्मचाऱ्यांना या उत्सवात सहभागी होण्यासाठी सक्षम करण्यासाठी, भारतभरातील सर्व केंद्र सरकारची कार्यालये, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्याोगिक आस्थापने २२ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत अर्धा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,’’ असे केंद्र सरकारची सर्व मंत्रालये, विभागांना जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.