केंद्र सरकारच्या कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयांच्या अखत्यारीतील ‘एगमार्क’ अर्थात एजीमार्कला मंजुरी देणाऱ्या नाशिकच्या पणन कार्यालयातील अधिकारी विशाल तळवलकर याला एक लाख रुपयांची लाच घेतांना सीबीआयच्या-एसबी पथकाने गजाआड केले.ही कारवाई साेमवारी (दि. २) नाशिकराेड येथील आनंदनगर भागातील कार्यालयात करण्यात आली. धुळे जिल्ह्यातील डेअरी प्राॅडक्ट व्यवसायिकास आवश्यक एगमार्कच्या प्रमाणपत्राची आवश्यकता हाेती. त्यासाठी त्याने नाशिकमधील कार्यालयाकडे अर्ज केला हाेता.
मात्र, संशयित तळवलकर व त्याच्या अखत्यारितील लिपिक आणि इतर स्टाफने एक लाख रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने सीबीआय-एसीबीच्या नाशिक युनिटकडे तक्रार नाेंदविली. त्यानंतर वरिष्ठ निरीक्षक रंजित पांडे व पथकाने सापळा रचून तळवलकर याला रंगेहाथ अटक केली. तपास सुरु आहे.