राज्यात पंढरपूरमध्ये धनगर समाजाचं आरक्षणासाठी आंदोलन तीव्र झालं आहे. तर जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी पुन्हा राज्याच्या केंद्रस्थानी आली आहे. याठिकाणी मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. तर मंगेश ससाणे यांनी ओबीसी बचावासाठी उपोषण सुरू केले आहे. वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके यांनी आंदोलनचा पुकारा केला आहे. या सर्व प्रकारावर ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सर्वांनाच मोठा सल्ला दिला आहे. काय म्हणाले भुजबळ?
जालन्याच्या वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी आंदोलक आमनेसामने उभे ठाकले आहेत. लक्ष्मण हाकेंच्या उपोषणस्थळी घोषणाबाजी झाली आहे. पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे, याविषयी भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाहीमध्ये कोणाला कुठे बसायचे उपोषणाला मी काय सांगणार. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उपोषणाला बसताय मला फोन करतात मी बसतो. मी काय सांगू त्यांना. तसे त्यांनी सुरू केलं तर यांनी सुरू केलं. जे काय करायचं ते शांततेने करा. कायदा सुव्यवस्थेचा शांततेचा भंग होणार नाही याची काळजी घ्या. लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. लोकशाहीमध्ये अहिंसक आंदोलन करण्याची परवानगी आहे, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली.
लोकांना अहिंसक आंदोलन, सत्याग्रह,अन्नत्याग हे आंदोलन करण्याचा अधिकार आहे, आपण त्यांना ना करू शकत नाही. त्यातून जे आहे उद्रेक होणार नाही लोकांना त्रास होणार नाही याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे. प्रश्न जे आहे ते बसून सोडावे लागतात. ज्या वेळेला प्रश्न सोडवले जातात प्रथा परंपरा कायदा काय आहे. कोर्टाचे नेम काय आहे. काय दिलंय काय मागणी आहे याचं विचार करूनच पुढे जाता येईल. एकदम असे अटीतटीवर येऊन चालणार नाही, असा टोला त्यांनी आंदोलनकर्त्यांना लगावला.