नाशिक : भाजपचे वरिष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नाशिकच्या जागेवर आपल्या नावाची सूचना करूनही महायुतीकडून जवळपास महिनाभरात कुठलीही कृती न झाल्याने एकप्रकारे आपली अवहेलना झाली. शेवटपर्यंत आपले नाव जाहीर केले गेले नाही. हा आपला अपमान असल्याने अखेरीस आपण उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेतल्याचे सूतोवाच ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी एका मुलाखतीत केल्यामुळे महायुतीतील खदखद पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदान होत आहे. मुळात नाशिकच्या जागेवर आपण उमेदवारीसाठी इच्छुक नव्हतो. ज्येष्ठ नेत्यांच्या आग्रहामुळे आपण निवडणूक लढविण्यास तयार झालो. तयारी सुरू केली. परंतु, अनेक याद्या जाहीर होऊनही आपले नाव येत नव्हते, याकडे भुजबळांनी लक्ष वेधले. मतदारसंघात आपल्याला मानणारा मोठा वर्ग आहे. सर्वांच्या पाठबळाने आपण विजयही मिळवला असता. मात्र उमेदवारी याद्या संपत आल्या तरी आपले नाव न आल्याने आपण स्पर्धेतून बाजुला झाल्याचे भुजबळांनी म्हटले आहे. अवहेलना, नाराजी अधोरेखीत करताना भुजबळांनी आता महायुतीचा प्रचार करीत असल्याचे नमूद केले.