राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला आहे. पक्षात कसलीही फूट पडली नाही, असं शरद पवारांनी सांगितलं असताना, निवडणूक आयोगानं ६ ऑक्टोबर रोजी पक्षफुटीवर सुनावणी ठेवली आहे, असा आरोप जयंत पाटलांनी केला. जयंत पाटलांच्या या विधानावर अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पक्षात फूट पडली नाही, आम्ही केवळ अध्यक्ष बदलला आहे”, असं विधान छगन भुजबळांनी केलं. जयंत पाटलांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना भुजबळ म्हणाले, “चांगली गोष्ट आहे. आम्हीही म्हणतो आमच्या पक्षात फूट पडली नाही. आम्ही फक्त अध्यक्ष बदलले आहेत. काही लोक बदलले आहेत. वेगवेगळे पदाधिकारी बदलले आहेत. जसे की अजित पवार हे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत. याबाबत निवडणूक आयोगाला आम्ही आधीच कळवलं आहे.”