मुंबई: पत्रकार परिषदेत छगन भुजबळ यांना तुमची पुढची भूमिका काय असेल? असा प्रश्न विचारला. त्यावर बोलताना भुजबळ म्हणाले, “मला माझी भूमिका घ्यायला आणखी वेळ लागेल. त्यासाठीच मी सर्वांशी चर्चा करत आहे”, असं त्यांनी म्हटलं. यावेळी काही वरिष्ठांना मंत्रिपद दिलं नाही, कारण तरुणांना मंत्रिमंडळात संधी द्यायची असते, या अजित पवारांच्या विधानासंदर्भात प्रश्न विचारला असता भुजबळ म्हणाले, “तरुणांना मंत्रिमंडळात संधी द्यायची ही चांगली गोष्ट आहे. मात्र, तरुणांना संधी द्यायची यासाठी व्याख्या ठरवली गेली पाहिजे. त्यामध्ये किती वर्षांपर्यंत तरुण म्हणायचं? मग ६७ ते ६८ वर्षांपर्यंतही तरुण म्हणायचं का? हे ठरवलं पाहिजे”, असा टोला छगन भुजबळ यांनी अजित पवारांना नाव न घेता लगावला.
भुजबळ पुढे म्हणाले, “मला अगोदर सांगितलं असतं की तुम्ही निवडणुकीत उभं राहू नका, मी राहिलो नसतो. पाच महिन्यांपूर्वी मला लोकसभेत पाठवत होते, तेव्हा माझी संपूर्ण तयारी झाली. मात्र, तेव्हाही मला थांबवावं लागलं. त्यानंतर राज्यसभेची निवडणूक आली तेव्हा म्हटलं मला राज्यसभेवर पाठवा. तेव्हा मला म्हणाले की, तुमची गरज राज्यात जास्त आहे. मग आता माझी गरज कमी झाली का? असं होतं तर मला निवडणूक लढवायला सांगायचं नव्हतं ना? आज माझ्या मतदारसंघात एक वेगळं वातावरण निर्माण झालं ते झालं नसतं. आता सर्व झाल्यानंतर मला सांगतात की राज्यसभेवर जा. मी आता राज्यसभेत जायचं याचा अर्थ मी विधानसभेचा राजीनामा द्यायचा. मग मी राजीनामा कसा देऊ?”, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.






