लोकसभा सोबतच आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होताच टीडीपी अध्यक्ष चंद्राबाबू नायडू आणि त्यांच्या पत्नी नारा भुवनेश्वरी यांचे अच्छे दिन आले आहेत. निवडणुकांचे निकाल समोर आल्यानंतर अवघ्या पाच दिवसांत भुवनेश्वरी यांच्या संपत्तीत 579 कोटींची वाढ झाली आहे. त्यांच्या संपत्तीत वाढ होण्याचे कारण म्हणजे त्यांची हेरिटेज फूड्स लिमिटेड ही कंपनी आहे, ज्यांच्या शेअरच्या किमती निवडणुकीच्या निकालानंतर मोठ्या प्रमाणात मुसंडी मारली आहे.
कोविड काळापासून मोठ्या नुकसानीचा सामना करत असलेल्या या एफएमसीगी क्षेत्रातील कंपनीच्या शेअर्सने लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी मोठी उडी घेतली. या कंपनीत नारा भुवनेश्वरी यांची सुमारे 24.37 टक्के भागीदारी आहे. त्यांच्याकडे कंपनीचे 2,26,11,525 शेअर्स आहेत.चंद्राबाबू नायडू यांनी 1992 मध्ये या कंपनीची स्थापना केली होती. त्याच्या उत्पादनांमध्ये दूध, दही, लस्सी, पनीर, तूप, चीज आणि इतर दुग्धजन्य पदार्थांचा समावेश आहे. नारा भुवनेश्वरी या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष आहेत.
मंगळवारी लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी, जेव्हा शेअर बाजारात मोठी घसरण झाली. त्याच दिवशी हेरिटेज फूड्सच्या शेअर्समध्ये वाढ झाली. त्यानंतर सलग पाच दिवस त्याच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. शुक्रवारीही शेअरचे भाव वधारले आणि प्रति शेअर 659 रुपयांवर पोहोचले.हेरिटेज फूड्सच्या शेअरची किंमत गेल्या पाच दिवसांत 256.10 रुपयांनी वाढली आहे. कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा एन लोकेश याच्या संपत्तीतही मोठी झेप घेतली आहे. लोकेशही या कंपनीचा प्रवर्तक आहे.