लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं आहे. महायुतीला त्या तुलनेत अत्यंत कमी जागा मिळाल्या आहेत. महायुतीला कमी जागा का मिळाल्या याचं विश्लेषण महायुतीचे नेते करत असतानाच महायुतीचे नेते आणि राज्यातील बडे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मेहनत घेतल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. पण त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सर्वाधिक झाल्याने त्याचं आत्मपरीक्षणही उद्धव ठाकरे यांनी करावं, असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. पाटील यांच्या या विधानाने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात मीडियाशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त मेहनत उद्धव ठाकरे यांनी घेतली. त्यांची ही मेहनत पाहून एक मित्र या नात्याने मनात भीती वाटायची. प्रत्येकाला काही ना काही आजारपण असतात. तसं त्यांचंही आहे. तरीही त्यांनी मेहनत घेतली. ते खूप फिरले. पण त्यांना 9 खासदार मिळाले, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.