चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरतीत एका जागेसाठी ४० लाख रुपये घेतले जात असल्याचा आरोप भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी विधानसभेत केल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण भरती प्रक्रियाच संशयास्पद आहे असेही म्हटले आहे. दरम्यान परीक्षा सुरू असताना संगणकात एकच प्रश्न व उत्तर अनेक वेळा येत असल्याने तसेच तांत्रिक बिघाडाने विद्यार्थ्यांनी गोंधळ घालत परीक्षा बंद पडली आहे.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत लिपिक २६१ व शिपाई ९७ अशा एकूण ३५८ पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू आली आहे. २१, २२ व २३ डिसेंबर रोजी या पदांसाठी ऑनलाईन परीक्षा घेतली जात आहे. ही परीक्षा सुरू असताना येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात चुकीचे प्रश्न दिल्याने विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला आहे. सर्वच परीक्षा केंद्रावर ऑनलाईन संगणक सर्वर डाऊन झाल्याने अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेर येत गोंधळ घालून परीक्षा बंद पाडली आहे. तसेच अनेक विद्यार्थी चंद्रपूर बँकेत फोन करून याबाबतची माहिती देत आहेत. मात्र बँकेकडून कोणीही फोन घेऊन उत्तर देत नसल्याने विद्यार्थी आणखीच संतापले आहेत. दरम्यान अशातच आता विधानसभेत आमदार किशोर जोरगेवार यांनी या भरतीत मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप केला आहे. एकूण ३५८ पदांसाठी ही भरती सुरू आहे. बँकेच्या वर्तुळातून काही दलालांनी तीन ते चार दिवसांपासून उमेदवारांना फोन केले. एका जागेसाठी ४० लाख रुपये मागत असल्याचा आरोप केला आहे. आमदार जोरगेवार औचित्याच्या विषयात प्रश्न करताना विधानसभा अध्यक्ष यांना ही बाब निदर्शनास आणून दिली. तसेच परीक्षा प्रक्रियेत देखील घोळ असल्याचे म्हटले आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून ३१ हजार १५६ उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज आले आहेत. ही परीक्षा राज्यातील नऊ जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर सुरू आहे. दरम्यान चंद्रपूर जिल्हा बँकेची परीक्षा चंद्रपूर जिल्ह्यात घेण्यात यावी, नाशिक, पुणे, औरंगाबाद, नांदेड व जालना जिल्ह्यांचा काय संबंध असा प्रश्न आमदार जोरगेवार यांनी उपस्थित केला आहेत.






