चंद्रपूर: लोकसभेसाठी तिकीट मिळावं यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू असताना भाजपचे नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मात्र निवडणुकीचं तिकीट नको आहे. तुमचं वजन वापरा आणि लोकसभेत जाण्याच्या भीतीतून मला मुक्त करा, असं आवाहन मुनगंटीवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केलं. मला भीतीमधून मुक्त करा, अशा शब्दांत त्यांनी थेट शिंदेंकडे मदत मागितली. चंद्रपुरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
नव्या संसदेच्या दरवाज्यासाठी वापरण्यात आलेलं लाकूड आम्ही इथूनच दिल्लीला पाठवलं. पण आत त्याच दारातून मला आत जावं लागतंय की काय अशी भीती मला वाटू लागली आहे. त्या दारातून जाण्याची वेळ माझ्यावर येऊ नये. तशी गरज पडू नये, असं म्हणत मुनगंटीवारांनी लोकसभा निवडणूक लढण्यास आपण अनुत्सुक असल्याचे स्पष्ट संकेत दिले.
मुख्यमंत्री साहेब तुमच्या अनुमतीनं राज्यगीत निवडलं. त्यात शब्द आहेत, दिल्लीचेही तख्य राखतो महाराष्ट्र माझा. आता दिल्लीला जाण्याचं बंधन माझ्यावर पडेल की काय याची भीती मला सध्या वाटते. मला या भीतीतून मुक्त करण्यासाठी तुम्ही तुमचं वजन वापरा, अशी साद मुनगंटीवार यांनी एकनाथ शिंदेंना घातली.