शरद पवार यांनी मतांची संख्या सांगत आम्हाला मतं जास्त मिळाली तरी जागा कशा काय कमी आल्या हा प्रश्न उपस्थित केला आहे. शरद पवारांनी त्यासाठी एक गणितच मांडलं. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणूक निकालाचं गणित मांडूनच शरद पवारांना उत्तर दिलं. आता आज भाजपाचे प्रदेशाध्य़क्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांनी अपयश झाकण्यासाठी असा खोटारडेपणा करु नये असं म्हटलं आहे.
शरद पवार यांचा आम्ही सन्मान करतो पण त्यांनी या वयात असा खोटारडेपणा करणं योग्य नाही. पराभव झाल्यावर तो स्वीकारायला हवा होता. पण पराभव स्वीकारता येत नाही म्हणून जनतेला कन्फ्युज करण्याचं आणि आपलं अपयश लपवण्याचं काम हे शरद पवार करत आहेत अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
विधानसभेत प्रचंड मोठा पराभव त्यांचा झाला. जनतेने त्यांना नाकारलं आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पराभवाची भीती आहे. आता शरद पवार जनतेला कन्फ्युज करत आहेत. मारकडवाडीत आलेले लोक हे शरद पवारांचे कार्यकर्ते आहेत असाही आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. जनतेनी लोकसभेचा खोटारडेपणा विधानसभेला दाखवून दिला. जर इतकंच असेल तर मारकडवाडीत यापूर्वी ज्या ज्या वेळी ईव्हिएमवर मतदान झालं तेव्हा आक्षेप का घेतले नाहीत? त्यांची आकडेवारी पाहिल्यानंतर आक्षेप घ्यायला हवे होते ना? आता जाणीवपूर्वक महाराष्ट्राची दिशाभूल करुन शरद पवार आपलं अपयश झाकण्याचं काम शरद पवार करत आहेत अशी बोचरी टीका चंद्रशेखर बावनकुळेंनी केली.