लोकसभा निवडणुका जाहीर होण्यास काही महिन्यांचा अवधी राहिला असताना राजकीय पक्षांनी आघाड्यांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी या आघाड्यांमध्ये सरळ लढत असणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीचा पहिला उमेदवार जाहीर केला आहे. अमरावतीमधून बावनकुळे यांनी अपक्ष खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ‘एबीपी माझा’च्या ‘झिरो अवर’ या कार्यक्रमात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी ही घोषणा केली.
अमरावती लोकसभेत आपल्याकडे दोन आमदार असल्याचे सांगत एकीकडे बच्चू कडू यांनी प्रहारला उमेदवारी मिळावी अशी मागणी केली. त्याशिवाय नवनीत राणा यांना जर उमेदवारी हवी असेल तर त्यांनी प्रहारकडून लढावं असंही कडू म्हणाले होते. त्यानंतर आता महायुतीतील प्रमुख पक्षाच्या अध्यक्षांनी नवनीत राणा या विजयी होतील असं म्हटल्याने राणा यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. ‘झिरो अवर’ या कार्यक्रमात बोलताना बावनकुळे यांनी महायुतीच्या नवनीत राणा या अमरावती मतदारसंघातून 51 टक्के मतांसह विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला