विधानसभेला जेवढ्या जागा शिंदे गटाला मिळतील, तेवढ्याच जागा आम्हाला मिळाल्या पाहिजे, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी केलं आहे. तसेच आगामी विधानसभेत सर्वच जाती धर्माच्या लोकांना बरोबरीने घेऊन चालावं लागेल, असेही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केलं.
“आगामी विधानसभेत राष्ट्रवादीला ८० जागा मिळायला हव्यात, असं बोललो होतो. त्यानंतर माझ्या विरोधात अनेकजण बोलले. अशाप्रकारे काही बोलू नका, असं मला सांगण्यात आलं. मात्र, माझ्या मते जागावाटपाचं गुहाळ शेवटपर्यंत चालवून त्याचा फायदा आपल्याला होणार नाही. जागावाटपापबाबत लवकर निर्णय घ्यायला हवा, आधी जागा वाटप करून घ्यावं लागेल, त्यानंतर उमेदवार ठरवता येईल”, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.
“भाजपा हा मोठा पक्ष आहे. मोठा भाऊ आहे. आम्ही त्यांना सांगितलं की आमचे सुद्धा ४०-४५ आमदार आहेत. जवळपास तेवढचे आमदार शिंदे गटाचे सुद्धा आहेत. त्यामुळे शिंदेंना जेवढ्या जागा मिळतील, तेवढ्या जागा आम्हाला सुद्धा मिळाल्या पाहिजे. आता शिंदेंचे खासदार जास्त निवडून आलेत. त्यामुळे त्यांना जास्त जागा मिळायला हव्यात, असं कोणी म्हणू नये. आपण सर्वांनी मिळून ही निवडणूक लढवायला हवी, आपण एक होऊन निवडणूक लढवली तर विधानसभेत सत्ता स्थापन करू शकू”, असेही ते म्हणाले.
विधानसभेत उमेदवारी देताना आपल्याला सर्व समाजाचा विचार करावा लागेल. दलित आणि आदिवसींच्या जागा राखीव आहेत. मात्र, इतरांना आपल्याला बरोबर घ्यावं लागेल. हा मोठा वर्ग आहे. मुस्लीमांना आपण पाठिंबा दिला पाहिजे. अशा वेळी धर्माचा विचार करून चालणार नाही. आपण त्यांच्याबरोबर आहोत, असा विश्वास त्यांना दिला पाहिजे”, असंही भुजबळ यांनी सांगितलं.