“मराठा समाज आणि ओबीसी बांधवांमध्ये वादविवाद व्हावा, अशी मंत्री छगन भुजबळ यांची इच्छा आहे. पण, पिढ्यानपिढ्या कधीच दोन्ही समाजांमध्ये वाद झाला नाही. इथून पुढेही वाद होणार नाही, गावखेड्यातील ओबीसी आणि मराठा बांधव आताही एकत्र आहेत, तुमची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही”, असा टोला मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांना लगावला आहे. ते जालन्यात बोलत होते.
पंढरपूरमध्ये आज ओबीसी बांधवांची जाहीर सभा होत आहे. या सभेसाठी मंत्री छगन भुजबळ पंढरपुरात दाखल झाले असून त्यांनी विठुरायाचं दर्शन देखील घेतलं. वादविवाद करणाऱ्यांना सदबुद्धी दे, असं साकडं देखील भुजबळ यांनी विठ्ठलांना घातलं. यावरुन जरांगे यांनी टीका केली आहे.
“मराठा आरक्षणाची खिंड लढवण्यासाठी कोट्यवधी मराठा तरुण मुंबईसाठी निघणार आहे. पाठीमागच्या आंदोलनाची लढाई सांभाळण्यासाठी सुद्धा लाखो माता-भगिनी सज्ज आहेत. सरकारने शहाणपणाची भूमिका घेऊन सकारात्मक पद्धतीने मराठा आरक्षणावर तोडगा काढला तर बरं होईल, नसता आमचा नाईलाज आहे”, असंही जरांगे यांनी म्हटलं आहे.
पंढरपुरातील सभेआधी विठुरायाचं दर्शन घेत वादविवाद करणाऱ्यांना सदबुद्धी दे, असं साकडं मंत्री छगन भुजबळ यांनी घातलं. त्यावर बोलताना, घातलेलं साकडं त्यांनाच लागू होतं, ओबीसी बांधव आणि मराठा समाजामध्ये वादविवाद व्हावा, अशी त्यांची इच्छा आहे. पण ती कधीच पूर्ण होणार नाही, असा टोलाही जरांगे यांनी भुजबळ यांना लगावला आहे.