गेल्या अनेक दिवसांपासून मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना तसेच आसपासच्या जिल्ह्यात एक ड्रोन घिरट्या घालत असल्याचं समोर आलं आहे. रात्री अपरात्री फिरणाऱ्या या ड्रोनमुळे ग्रामीण भागात घबराटीचं वातावरण पसरलं आहे. कुणी चोरी करण्याच्या हेतूने आपल्यावर पाळत तर ठेवत नाहीये ना? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी या ड्रोनबाबत महत्वाची माहिती दिली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड, वैजापूर, गंगापूर, पैठणसह अनेक जिल्ह्यात घिरट्या घालणाऱ्या ड्रोनचा उलगडा झाला आहे. ग्रामीण भागात उडणारे हे ड्रोन सर्वे करण्यासाठी उडवले जात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दिल्लीतील एका खाजगी कंपनीकडून ड्रोनद्वारे सर्वे करण्यात येत असून यासाठी आम्ही लेखी परवानगी दिली आहे, असंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
आता रात्री अपरात्री ड्रोन दिसला तर नागरिकांनी अजिबात घाबरून जाऊ नये, असं आवाहन देखील पोलिसांच्या वतीने करण्यात आलं आहे. पोलिसांच्या या माहितीनंतर अनेकांचा जीव भांड्यात पडला आहे. मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये रात्री अपरात्री ड्रोनच्या घिरट्या वाढल्या होत्या. घरावर तसेच शेतावर अचानक हा ड्रोन यायचा अन् घिरट्या घालून निघून जायचा.
सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव, पानवडोद बुद्रुक तसेच आसपासच्या गावातही या ड्रोनने घिरट्या घातल्या. त्यामुळे परिसरातील नागरिक धास्तावले होते. सोशल मीडियावर या ड्रोनची मोठी चर्चा रंगली होती. चोरी करण्याच्या उद्देशाने अज्ञात व्यक्तींकडून हे ड्रोन फिरवले जात असल्याच्या अफवा सिल्लोड तालुक्यात रंगल्या होत्या.
मात्र, पोलिसांनी या ड्रोनच्या नाट्यावर आता पडदा टाकला आहे. ग्रामीण भागात फिरणाऱ्या या ड्रोनद्वारे शेती सर्वेक्षण करण्याकरता फोटो व शॉर्ट व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येत आहे. यासाठी खासगी कंपनीने पोलिसांकडून परवानगी देखील घेतली आहे. त्यामुळे या ड्रोनचा चोर किंवा दरोडेखोर यांच्याशी काहीही संबंध नसल्याचं उघड झालं आहे.