अहमदनगर : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे कोणत्याही नेत्याचे स्टेटस ठेवू नका, राजकीय मत मांडू नका यासह
इतर आचारसंहिता काटेकोरपणे पाळावी, असे आदेश जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना सामान्य प्रशासन
विभागाने काढले आहेत. जिल्हा परिषदेत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांनी कर्तव्यावर किंवा रजेवर असताना राजकीय सभेमध्ये, कार्यक्रमात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग घेऊ नये. तसेच प्रक्षोभक भाषण किंवा कोणत्याही प्रकारचे टिपण करू नये. मोबाइलवर, सोशल मीडियांवर कोणत्याही राजकीय
पक्षाचे, नेत्यांचे स्टेटस ठेवू नये. सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतेही राजकीय मत प्रदर्शित करू नये, कार्यालयीन शिस्तीचे काटेकोर पालन करावे, असे आदेश जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांनी काढले आहेत.
जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली असल्याने जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आचारसंहितेचे पालन करावे.आचारसंहिता वर्तणूक नियमभंग केल्याचे जिल्हा परिषदेच्या निदर्शनास आल्यास अथवा याबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार प्राप्त झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी काढल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेळके यांनी दिली.