मुंबई : राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली असून 15 डिसेंबर रविवारी दुपारी 3 वाजता नागपुरात यंदा मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचे समजते. त्याच पार्श्वभूमीवर महायुतीमधील तिन्ही पक्षाच्या आमदारांची उत्कंठा वाढली असून मंत्रिपदाच्या यादीत कोणाचं नाव येईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर, महायुती सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या मंत्र्यांना पुन्हा संधी मिळणार असून आमदार संजय राठोड यांनाही संधी दिली जाईल, अशी चर्चा आहे. विदर्भातील शिवसेनेचा कोठा आणि बंजारा समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी राठोड यांना महायुती सरकारमध्ये मंत्रिपद दिले जाऊ शकते. त्याच, अनुषंगाने आमदार चित्रा वाघ यांना प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच, लाडक्या बहिणींना देखील मंत्रिमंडळात स्थान असेल, असे वाघ यांनी म्हटले.
महायुती सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या संजय राठोड यांच्यावर आमदार चित्रा वाघ यांनी गंभीर आरोप केले होते. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वाघ यांनी पोलीस स्टेशनला जाऊन पीडित कुटुंबीयांच्या न्यायाची मागणी केली होती. तसेच, संजय राठोड यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यासही महाविकास आघाडी सरकारला भाग पाडले होते. मात्र, शिवसेनेतील बंडानंतर संजय राठोड हे एकनाथ शिंदे यांच्यासमवेत पुन्हा भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर, चित्रा वाघ यांची भूमिका मवाळ झाली. तसेच, राठोड यांच्याविरुद्ध त्यांनी घेतलेली भूमिकाही बदलल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. आता महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळातही संजय राठोड यांना स्थान मिळेल, यासंदर्भात चित्रा वाघ यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावरही त्यांनी सावध प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं.
संजय राठोड यांना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी क्लीनचीट दिलेली असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. त्यामुळे, त्यांना गत मंत्रिमंडळात मंत्रिपद देण्यात आलं. माझी लढाई अजून संपलेली नाही, यावेळेस काय होते हे पाहू, असे म्हणत संजय राठोड यांच्या मंत्रिपदावर आमदार चित्रा वाघ यांनी आपली भूमिका मांडली.