नगर: चित्रकूट गुरूकुलच्यावतीने नवीन पिढी घडविण्यासाठी योगदान देणाऱ्या शिक्षकांचा फाऊंडेशन बिल्डर अवार्डने सन्मान करण्यात आला. नगरमधील ५० अधिक शाळांमधील २०० पेक्षा अधिक शिक्षकांचा सन्मान सोहळा नुकताच पार पडला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खुर्शिद दमानिया अ़ंगोलकर, वक्ते म्हणून वर्षा रिबेलो, डॉ.तोसेंद्र द्विवेदी, कोमल गोएंका यांच्यासह चित्रकूट इंटरनॅशनल स्कूलचे संचालक संजय चव्हाण, सीईओ अशोक सचदेव, चित्रकूट गुरूकुलच्या प्राचार्या सारिका आनंद आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गणेश वंदनेने झाली. प्रास्ताविक करताना सारिका आनंद यांनी सांगितले की, समाजाचा सर्वांगीण विकास साधून राष्ट्र निर्माणात योगदान देणारी पिढी घडविण्याचे काम शिक्षक, शिक्षण संस्थाचालक करत असतात. शिक्षक फक्त पुस्तकी ज्ञान देत नाही तर मुलांमध्ये नीतीमूल्य, संस्कार रूजवून त्यांना भविष्यातील स्पर्धेच्या युगासाठी अधिक सक्षम बनवतात. ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या अशा शिक्षकांचा चित्रकुट गुरूकुलच्यावतीने द फाऊंडेशन बिल्डर अवार्डने सन्मान करतांना मनापासून आनंद होत आहे. यावेळी शिक्षण, व्यवसाय, तंत्रज्ञान क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी भविष्यातील शिक्षण, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, नवनवीन तंत्रज्ञान व शिक्षण पद्धती यावर विचार मांडले.
या कार्यक्रमासाठी सन १९४६ पासून सर्वोत्तम व विश्वसनीय सुवर्ण सेवा देणारे सहदेव ज्वेलर्स, ओमोटेक ही संस्था जी संशोधन आणि नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमात अग्रेसर आहे आणि रेक्स शूज ही भारतातील अग्रगण्य फुट वेअर निर्माता कंपनीचे सहकार्य लाभले.