Tuesday, March 18, 2025

धनगर समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र महामंडळ… चौंडी येथे मुख्यमंत्री शिंदेंचे सूतोवाच..

*मुलीच्या वस्तीगृहांना अहिल्यादेवीचे नाव*

*मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, स्वतंत्र महामंडळाचेही* *सूतोवाच*

जामखेड प्रतिनिधी – नासीर पठाण )
चोंडी – लोकमाता आणि राष्ट्रमाता अहिल्यादेवी यांचे कार्य आदर्शवत आहे. त्यामुळे राज्यभरातील मुलींच्या वस्तीगृहांना अहिल्यादेवींचे नाव दिले जाईल तसेच सर्व शासकीय दस्तावेजामध्ये अहिल्याबाई ऐवजी अहिल्यादेवी असा उल्लेख केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी जामखेड तालुक्यातील चौंडी येथे केली. धनगर समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचे सूतोवाच त्यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 299 जयंती उत्सवाचा कार्यक्रम जामखेड तालुक्यातील चौंडी या त्यांच्या जन्मगावी उत्साहात झाला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, प्राध्यापक रामभाऊ शिंदे व गोपीचंदभाऊ पडळकर यांनी अहमदनगरचे नाव अहिल्यादेवी नगर करण्यासाठी अनेक वर्ष संघर्ष केला, परंतु जेव्हा आम्ही सरकार पालटून टाकले व त्यानंतर नाव बदलले गेले. यातून सर्व सामान्य यांना न्याय देणारे आमचे सरकार आहे, हे स्पष्ट झाले. आमच्या पोटात एक आणि ओठात दुसरे असे काही नसते, आम्ही मनमोकळेपणाने शब्द देतो व ते पूर्ण करतो, असे स्पष्ट करून शिंदे म्हणाले, आदिवासी समाजाच्या 22 योजनांचा लाभ धनगर समाजाला दिला जात आहे. मुलींच्या वस्तीगृहाला आता अहिल्यादेवी यांचे नाव दिले जाणार आहे. धनगर समाजाच्या युवकांना उद्योग व्यवसाय सुरू करता यावे यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे धर्तीवर स्वतंत्र महामंडळ सुरू केले जाणार आहे तसेच अहिल्याबाई ऐवजी अहिल्यादेवी असा उल्लेख सर्व शासकीय कागदपत्रातून करण्यासाठी स्वतंत्र आदेश काढले जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. पुढील वर्षी अहिल्या देवींचा त्रिशताब्दी जन्मोत्सव राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात साजरा केला जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.

अहिल्यादेवी जयंती जन्मोत्सव समितीचे स्वागत अध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे यांनी प्रास्ताविक केले. अहमदनगरचे नाव अहिल्यानगर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे त्यांनी आभार मानले. अहिल्यादेवींचे त्रिशताब्दी जन्म वर्ष सुरू झाल्याने या वर्षभरात अहिल्यादेवींनी राज्यभरात उभारलेल्या विकास कामांचे संवर्धन व्हावे व काही ठिकाणी पुनर्बांधणी व्हावी, चौंडी हे गाव राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे अशा मागण्या त्यांनी केल्या.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, आचारसंहिता संपल्यावर अहमदनगर येथे मोठा कार्यक्रम घेऊन अहिल्यानगर नामकरण सोहळा करणार आहोत तसेच नगर येथेच गुजरात मधील स्टेच्च्यु ऑफ युनिटीच्या धर्तीवर अहिल्यादेवींचा भव्य पुतळा व स्मारक केले जाणार आहे. त्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते करणार आहोत, असे स्पष्ट करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात यावर्षीपासून अहिल्यादेवी अध्यासन सुरू करावे, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली
पुण्यश्लोक अहील्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनाच्या निमिताने श्रीक्षेत्र चौंडी येथे आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री रामदास आठवले मंत्री अतुल सावे संजय बनसोडे आ.राम शिंदे आ.मोनिका राजळे आ.गोपीचंद पडळकर जेष्ठ नेते आण्णासाहेब डांगे जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले आदीसह मान्यवर उपस्थित होते.
प्रतिनिधी नासीर पठाण सह पत्रकार आशोक निमोणकर जामखेड .

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles