अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील जलजीवन योजनेच्या अपूर्ण कामाच्या आढावा बैठकीदरम्यान ठेकेदार आणि माजी सरपंच तथा ग्रामपंचाय सदस्य यांच्यात बाचाबाची होवून चिडलेल्या ठेकेदाराने ग्रामपंचायत सदस्याच्या थेट कानाखाली ठेवून दिली. हा प्रकार इतका अचानक घडला की उपस्थित अधिकार्यांची देखील यावेळी भंबेरी उडाली. दरम्यान या घटनेनंतर पाणी पुरवठा विभागाने घडलेल्या प्रकाराबाबत कानावर हात ठेवत बैठकीत काही लोकांमध्ये वादावादी झाली. मात्र वाद घालणारे ते कोण आहेत होते, माहित नसल्याचे सांगत घडलेल्या प्रकारापासून स्वतःला लांब ठेवण्याचा प्रयत्न केला.
पारनेर तालुक्यातील जलजीवन योजनेतील कामाचा आढावा घेण्यासाठी, रखडलेली तातडीने पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग, पारनेर पंचायत समिती पाणी पुरवठा विभाग यांनी नगरला जिल्हा परिषदेचे मुख्यालयात शुक्रवारी दुपारी आढावा बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एच. बी. चव्हाण यांच्यासह तालुका पातळीवरील पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी, जलजीवन पाणी योजना अपूर्ण असणार्या गावातील सरपंच यांच्यासह ठेकेदार उपस्थित होते.
बैठकीत पारनेर तालुक्यातील एका गावाच्या जलजीवन योजनेचा आढावा सुरू होता. यावेळी संबंधित गावचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य आणि पाणी योजनेचा ठेका घेतलेला ठेकेदार आणि त्यांचे सहकारी हजर होते. बैठकीत संबंधीत गावातील जलजीवन पाणी योजनेचा आढावा सुरू असतांना ठेकेदार आणि संबंधित ग्रामपंचायत सदस्य यांच्या अपूर्ण कामावरून हमरी-तूमरी झाली. एकमेकांनी पाणी योजना अपूर्ण असल्याचे कारण पुढे केले. सुरुवातीला गरमागरम सुरू असणारी ही चर्चा अखेरच्या टप्प्यात पोचली त्यावेळी संतप्त झालेल्या ठेकेदाराने थेट ग्रामपंचायत पदाधिकार्याच्या श्रीमुखात भडकवली.
बैठकीत घडलेला प्रकार अनपेक्षित असल्याने सुरुवातीला काय झाले हे कोणालाच समजले नाही. मात्र प्रकरण हातघाईवर आल्याचे पाहताच अधिकारीही थरथरले. बैठकीत हजर असणार्यांपैकी काहींनी पुढे होत ठेकेदार आणि सदस्य यांना बाजूला नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघांनी एकमेकांच्या डोक्यात खूर्ची घालण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे गडबडलेल्या अधिकार्यांनी बैठक आखडती घेतली. काही वेळाने तणाव निवळ्यानंतर सर्वजन निघून गेले. दरम्यान याबाबत जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाशी संपर्क केला असता, जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाशी या वादाचा संबंध नाही. संबंधीत गावात असणार्या वादाचे पडसाद बैठकीत उमटले, असे सांगत हात झटकले.
पारनेर तालुक्यातील जलजीवन विभागाच्या अपूर्ण कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात तालुक्यातील सरपंच आणि ठेकेदार यांची बैठक बोलवण्यात आली. यावेळी अपूर्ण कामावरून काही लोकांमध्ये वाद झाले. वाद घालणारे कोण होते, हे मी ओळखत नाही. झालेला वाद हा आपआपसातील असण्याची शक्यता आहे.
एच. बी. चव्हाण, कार्यकारी अभियंता,
ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, अहिल्यानगर.






