अहमदनगर-१ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात पोषण माह सप्ताहांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. त्याअनुषंगाने पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
या सप्ताहांतर्गत जिल्ह्यातील गावागावांमध्ये स्वच्छतेच्या अनुषंगाने विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात येणार आहे. अशी माहीती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिली या उपक्रमांतर्गत नवीन वाढीव कुटुंबांना वैयक्तिक शौचालयासाठी अर्ज करण्यास प्रोत्साहीत करण्यात येणार आहे. हात धुण्याबाबत जनजागृती केली जाणार आहे. ज्या कुटुंबांना वैयक्तिक शौचालयाची मंजुरी देण्यात आलेली आहे. परंतु अद्याप बांधकाम सुरु केले नाही.
त्यांना शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहीत करुन निकषासह अनुदान वाटप केले जाणार आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली आहेत.सार्वजनिक शौचालय कार्यात्मक असल्याबाबत खात्री केली जाणार आहे. शौषखड्डा मोहीम राबविण्यात येणार आहे. गावातील नाल्यांची साफसफाई होणार
आहे.
सार्वजनिक ठिकाणी जमा झालेल्या कचऱ्याची शास्त्रशुध्द पध्दतीने विल्हेवाट लावण्यात येणार असून, स्वच्छतेचे महत्व पटवून दिले जाणार आहे. तसेच अतिसार प्रतिबंध व स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.कचरामुक्तीत जिल्हा परिषदेने उत्तम कामगिरी केली असून गावा गावात कचरामुक्तीसाठी प्रयत्न केले जात आहेत. याअनुषंगाने जिल्हा परिषद प्रशासनाकडून संबधित पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. तरी ग्रामस्थानी जास्तीत जास्त सहभाग नोंदवून अभियान यशस्वी करावे असे आवाहन जलजीवनचे प्रकल्प संचालक समर्थ शेवाळे यांनी केले आहे.