आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि चंद्राबाबू नायडू यांचे कट्टर विरोधक जगनमोहन रेड्डी यांच्या काळात तिरुपती देवस्थानाच्या वतीनं भक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या प्रसादाच्या लाडूंमध्ये शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तिरुपतीच्या लाडूंबद्दल केलेल्या मोठ्या दाव्यामुळे मोठा गदारोळ माजला आहे. चंद्राबाबू नायडूंच्या दाव्यामुळे आंध्र प्रदेशात मोठा वाद निर्माण झाला आहे.
मागील पाच वर्षांमध्ये जेव्हा वायएसआर काँग्रेस पक्ष सत्तेत होता तेव्हा त्यांनी पवित्र मानल्या जाणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानचं पावित्र्य घावलंल. ‘अन्नदानम’ अर्थात जे अन्नदान मंदिरातर्फे केलं जातं त्याच्या दर्जाची पातळीही काँग्रेसच्या काळात खालावलेली होती. तिरुमला तिरुपती देवस्थान येथील लाडू हे पवित्र प्रसाद मानले जातात. या लाडूंमध्ये शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांच्या चरबीचा वापर करण्यात आला. आमचं सरकार आल्यापासून आम्ही शुद्ध तुपातील लाडू तयार करण्यास सुरुवात केली आहे. तसंच मंदिरातील अन्नदानात दिल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जाही आम्ही सुधारला आहे. असं चंद्राबाबू नायडूंनी म्हटलं आहे. ANI ने हे वृत्त दिलं आहे.