वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करा-जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ
अहमदनगर दि.१०- वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी आणि अधिक अपघातप्रवण क्षेत्रातील अपघात कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत दिले.
बैठकीस मनपा आयुक्त यशवंत डांगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, महामार्गावर अपघात टाळण्यासाठी वाहनांच्या वेगाला मर्यादा घालणे आवश्यक आहे. वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी कॅमेरे लावण्यात यावे. किशोरवयीन मुलांकडून होणाऱ्या वाहतूक नियमांच्या उल्लंघनाबाबत कारवाई करावी, तसेच त्यांचे समुपदेशनही करावे. रस्त्याच्या बाजूला असलेले धोकादायक फलक त्वरित काढण्यात यावे. रस्ता दुभाजकांची आवश्यक दुरुस्तीची कामे करण्यात यावीत. रस्ता दुभाजक अनधिकृत तोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे.
शाळा आणि महाविद्यालयांमधून वाहतूक नियमांबाबत प्रबोधन करण्यात यावे. वारंवार तक्रारी असलेल्या शैक्षणिक परिसरात स्वतंत्र पथक नियुक्त करावे. शालेय परिवहन समितीच्या बैठकीत रस्ता सुरक्षा नियमांबाबत माहिती द्यावी.
बैठकीत जिल्ह्यातील अपघातप्रवण क्षेत्राबाबत रेझिलियंट इंडिया या अशासकीय संस्थेचे प्रतिनिधी राजीव चौबे यांनी सादरीकरण केले. यातील अधिक गंभीर ब्लॅक स्पॉटबाबत तातडीने उपाययोजना सुरू कराव्यात असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
बैठकीत शासकीय आणि अशासकीय सदस्यांनी रस्ता सुरक्षेबाबत विविध सूचना केल्या.