आधारवरील पत्त्याचा पुरावा अद्ययावत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
अहमदनगर दि.२९ : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार सर्व नागरिकांना आधारशी संलग्न ओळखीचा पुरावा व पत्त्याचा पुरावा अद्ययावत असणे आवश्यक असून नागरिकांनी आधारशी संलग्न माहिती अद्ययावत करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे.
अहमदनगर जिल्ह्यात शासकीय १०२ आधार केंद्र, महिला बाल विकास विभागाच्या ६९ आधार केंद्र, सीएससी ई-गव्हर्नन्स चे ७५ केंद्र, बँकेचे १४ , बीएसएनएलचे ४, पोस्ट ऑफिसच्या ९८ अशा जिल्ह्यातील एकूण ३८८ आधार केंद्रांवर आधार नोंदणी आणि माहिती अद्ययावत करता येईल.
महिला व बालकल्याण विभागांतर्गत ० ते ५ वयोगटातील बालकांची आधार नोंदणी अंगणवाडीमध्ये करण्यात येत आहे. ही नोंदणी नि:शुल्क आहे. बालकांच्या नोंदणीसाठी जिल्ह्यामध्ये ६९ संच प्राप्त झाले आहे. आपण पहिल्यांदाच आधार काढत असला तर ते पूर्णत: मोफत असते, त्यासाठी कोणत्याही प्रकारे शुल्क आकारले जात नाही. नोंदणी करतांना जन्म दाखला, ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा आवश्यक आहे.
आधार क्रमांक हा व्यक्तीच्या ओळखीचा पुरावा म्हणून वापरण्यात येतो. विविध सरकारी योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांकाचा वापर केला जात आहे. या योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी सर्व नागरिकांनी आपली आधार विषयक माहिती वैयक्तिक तपशिलासह अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे.
नागरिकांना प्रथमच आधार काढावयाचे असल्यास नोंदणी निःशुल्क आहे. आधार नोंदणी करून दहा वर्षे झाली असतील आणि या कालावधीत एकदाही आधार कार्डच्या वापर कोठेही केला नसल्यास ऑनलाईन पद्धतीने अथवा जवळच्या शासकीय आधार केंद्रावर जावून आधार कार्डची माहिती अद्ययावत करून घ्यावी. असे केल्याने नागरिकांना आधारबाबतच्या येणाऱ्या अडचणी दूर होवून त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता येईल.
आधार अद्ययावत करतांना ओळखीचा पुरावा म्हणून व्होटिंग कार्ड, पासपोर्ट , पॅनकार्ड , ड्रायव्हिंग लायसन्स, किसान फोटो पासबुक, नरेगा जॉब कार्ड, लग्न प्रमाणपत्र व छायाचित्र , शाळेचे ओळखपत्र, बँकेचे पासबुक यापैकी एक आवश्यक आहे. तर रहिवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबुक, शिधापत्रिका, वाहन चालवण्याचा परवाना, किसान पास बुक, नरेगा जॉब कार्ड, वीज देयक, पाणी देयक, दूरध्वनी देयक, लग्न प्रमाणपत्र किंवा गॅस जोडणी देयक यापैकी एक आवश्यक आहे.
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण यांच्या https://myaadhaar.uidai.gov.in पोर्टलद्वारे आधार कार्डची डेमोग्राफिक अपडेट करता येते ( नाव , पत्ता, जन्म दिनांक , लिंग , मोबाईल क्र. , ई-मेल ) त्यासाठी रु.५० ( पन्नास रूपये) इतका शुल्क आहे. हाताचे बोटाचे ठसे, डोळ्यातील रेटीना स्कॅनसाठी रु.१०० इतके शुल्क निर्धारीत केलेले आहे, असे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.
अधिक माहितीकरिता क्युआर कोड स्कॅन करावे किंवा www.uidai.gov.in या संकेतस्थळाला नागरिकांनी भेट द्यावी. जवळचे आधार नोंदणी केंद्र शोधण्याकरीता https:// https://ahmednagar.nic.in/service/ या या संकेतस्थळाला भेट द्यावी.