Monday, June 17, 2024

अहमदनगरच्या स्ट्राँग रुममध्ये घुसखोरीचा प्रयत्न,निलेश लंकेंच्या आरोपावर जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण; म्हणाले…

३७ – अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणा कार्यरत

सर्व सुरक्षारक्षक कर्तव्यावर दक्ष

मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या सुरक्षा कक्षाचे कॅमेरे सुरळीतपणे सुरु

– जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी

अहमदनगर दि. 22 मे :- ३७ – अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या सुरक्षा कक्षाबाबत मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व उपाययोजना करण्यात आली असून त्याबाबत कोणतीही कमतरता राहिलेली नाही. या ठिकाणी नेमण्यात आलेली त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणा नियमानुसार कार्यरत असून सर्व सुरक्षारक्षक कर्तव्यावर दक्ष असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

३७ – अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निलेश ज्ञानदेव लंके यांच्या एक्‍स या सोशल मिडिया अकाऊन्टवरून प्रसारित झालेल्या सुरक्षा कक्षाच्या सीसीटीव्ही व्हिडीओबाबत वस्तुस्थिती मांडताना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी माहिती दिली की, एक्स या सोशल मिडिया अकाऊन्टवर प्रसारित केलेल्या व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती ही निवडणूक प्रशासनाकडून विहित नियमानुसार नेमण्यात आलेली सीसीटीव्ही पुरवठादार आहे. या पुरवठादाराशी झालेल्या करारनाम्यानुसार सीसीटीव्ही व आनुषंगिक उपकरणे वेळोवेळी तपासून त्या सुस्थितीत असल्याची खात्री करण्याची जबाबदारी पुरवठादाराची आहे. लोकसभा मतदारसंघांच्या ईव्हीएम ठेवलेल्या सुरक्षाकक्षाच्या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही तसेच सुरक्षा व्यवस्थेची दैनंदिन देखरेख करण्याकरिता जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, अहमदनगर यांच्या दि. ६ मे २०२४ व १७ मे २०२४ च्या आदेशानुसार जिल्हास्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

या आदेशानुसार दि. २१ मे २०२४ रोजी सायंकाळी ४ ते रात्री १२ वाजेपर्यंत राहुल शेळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहमदनगर यांची नेमणूक करण्यात आली होती. दि. २१ मे २०२४ रोजी सायंकाळी ७:५४ वाजता श्री. शेळके यांना ३७ अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणी हॉलच्या एका कॅमेऱ्याचे लूज कनेक्शन असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानुसार त्यांनी सायंकाळी ८:१५ वाजता सदर पुरवठादार अजिनाथ शिवाजी मुळे, स्वामी एन्टरप्रायझेस यांना सीसीटीव्ही व आनुषंगिक उपकरणांची तपासणी करण्याकरिता कळविले होते. त्यानुसार सदर पुरवठादार यांनी तिथे उपस्थित असलेल्या सीआरपीएफ सुरक्षारक्षकांना याबाबत पूर्वकल्पना दिली होती. तसेच सीआरपीएफ सुरक्षारक्षकांच्या नोंदवहीमध्ये प्रवेश करण्याबाबत सायंकाळी ८:२० वाजता नोंद केली होती. तद्नंतर दोन सीआरपीएफ सुरक्षारक्षकांसोबत वरील सीसीटीव्ही पुरवठादार यांनी मतमोजणी हॉलच्या कॅमेऱ्याची तपासणी केली होती. त्यानंतर सायंकाळी ८:२५ वाजता तिथून निघताना पुन्हा सीआरपीएफ सुरक्षारक्षकांच्या नोंदवहीमध्ये नोंद केली होती.

निलेश लंके यांनी केलेलं ट्विट हे अपुऱ्या माहितीवर आधारित असल्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी म्हटले आहे. सीसीटीव्हीची वायर दुरुस्त करण्यासाठी कर्मचारी गेला होता. ज्या ठिकाणी गोडाऊन आहे त्या ठिकाणी तीन पद्धतीची सुरक्षा आहे. सीसीटीव्हीची वायर लीक झाल्याचा प्रकार तेथील कर्मचाऱ्याने लक्षात आणून दिला. त्या ठिकाणी जे वेंडर कर्मचारी आहे त्यांना आम्ही ओळखपत्र दिलेले आहे. संबंधित कर्मचारी परवानगी घेऊन आत गेला होता. दुरुस्ती करून कर्मचारी बाहेर आला, असे निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी सांगितले.
३७ अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या सुरक्षा कक्षाचे कोणतेही कॅमेरे नादुरुस्त नसून ते सुरळीतपणे काम करीत असल्याचेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles