अहमदनगर – नंदीवाले समाजातील व्यक्तींना जात पंचायतच्या लोकांनी जातीतून बाहेर काढलेल्या तक्रारीची सखोल चौकशी करून सर्व जात पंचायतला तसेच तक्रारदार व गैर अर्जदार यांना पोलिस ठाण्यात बोलावून यशस्वी मध्यस्थी करत नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी सदरील तक्रार अर्ज निकाली तर काढलाच शिवाय पंचांना तक्रारदाराला पाणी पाजायला लावून त्यांच्यात मिलापही घडवून आणला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, नंदीवाले समाजातील व्यक्तींना जात पंचायतच्या लोकांनी जातीतून बाहेर काढले असल्याची तक्रार जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे करण्यात आली होती. या तक्रारीवर योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते यांना दिले होते. त्यानुसार गिते यांनी या तक्रार अर्जाचा बारकाईने अभ्यास केला. त्यानंतर तक्रारदार, ज्यांच्या विरुद्ध तक्रार आहे असे व्यक्ती, जात पंचायतचे पंच आणि समाजातील नागरिकांना त्यांनी पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. त्या नंतर ही तक्रार बनावट असल्याचे समोर आले. तक्रारदाराने सदरचा तक्रार अर्ज हा शेत जमिनीच्या वादातून केला असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे हा तक्रार अर्ज निकाली काढला.
मात्र या तक्रारी मुळे समाजातील दोन गटांची दुखावलेली मने जोडण्यासाठी जमलेल्या सर्वांचे व्यवस्थित प्रबोधन केले. शेवटी पंचांच्या हस्ते तक्रारदाराला पाणी पाजायला लावून दोन्ही गटात पर्यायाने संपूर्ण समाजात मिलाप घडवून आणला.
यानिमित्ताने नगर तालुका पोलिस ठाण्याचा नव्यानेच पदभार घेतलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी कायदा, सुव्यवस्था, गुन्हेगारीवर नियंत्रण याचे तर ज्ञान आहेच पण सामाजिक भानही आहे हे दाखवून दिले. गिते यांच्या या ‘स्मार्ट पोलिसिंग’चे सर्वत्र कौतुक होत आहे.