विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षांची तयारी सुरु आहे. त्यानुसार श्रीरामपुर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाची अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. विधानसभा निहाय काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू असताना दोन गटात गोंधळ झाला. यात काँग्रेसचे पक्ष निरीक्षक आमदार मुज्जफर हुसेन यांच्या समोरच आमदार लहू कानडे आणि हेमंत ओगले गट आमने सामने आल्याने या मुलाखतींमध्ये गोंधळाचे वातावरण झाले होते.
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र या बालेकिल्ल्यात आता गटबाजी उफाळून आली. विद्यमान आमदार लहू कानडे यांच्या विरोधात अनेक वर्षांपासून पक्ष संघटनेत राज्य आणि देशपातळीवर काम करणारे हेमंत ओगले यांनी दंड थोपटले आहेत. आज पक्ष निरीक्षक आमदार मुज्जफर हुसेन हे श्रीरामपूर विधानसभेसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेत असताना कानडे आणि ओगले गट आमने सामने आले. यावेळी ओगले समर्थकांनी आमदार लहू कानडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत हेमंत ओगले यांच्या उमेदवारीचा आग्रह धरला. तर ओगले समर्थकांच्या घोषणाबाजीला कानडे समर्थकांनी घोषणाबाजीने प्रतिउत्तर दिल्याने मुलाखती दरम्यान प्रचंड गोंधळ बघायला मिळाला.
श्रीरामपूर विधानसभेसाठी उमेदवारीसाठी इच्छुक असलेले हेमंत ओगले यांनी या गोंधळाबाबत प्रतिक्रिया देताना काँग्रेसकडे उमेदवारी मागतोय. विद्यमान आमदारांनी मतदारसंघात काहीही काम केलं नाही. उलट विरोधात काम करणाऱ्यांना सोबत घेतलं. मागिल पाच वर्षात मतदारसंघाच्या विकासाला खिळ बसली असून त्याचा राग मतदारांमध्ये असल्याने आमदारांवर नाराजी आहे. घोषणाबाजी करणं म्हणजे उद्रेक नसून हे लोकशाहीचं प्रतीक आहे. फक्त काँग्रेसमधूनच नाही तर मतदारसंघातच आमदारांना विरोध असल्याचा दावा हेमंत ओगले यांनी केलाय. तर आपल्याच पक्षाच्या आमदाराविरोधात घोषणाबाजी करणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया आमदार लहू कानडे यांनी दिली.