राज्यातील लोकसभेच्या 48 जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीचा अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही. नगर लोकसभेसह राज्यातील जागांबाबत महाविकास आघाडीच्या तिनही पक्ष विचार करून उमेदवार ठरवू. नगर लोकसभेबाबत मी उमेदवार नाही, यामुळे या विषयावर आत्ताच बोलणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस विधिमंडळ नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी दिली.
नगरच्या शासकीय विश्रामगृहावर आ. थोरात यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नगर लोकसभा मतदारसघांतून निवडणूक लढवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून आपणास केली जात आहे, असा प्रश्न आ.थोरात यांना विचारण्यात आला. त्यावर आ. थोरात म्हणाले, आम्ही महाविकास आघाडीत आहोत. तीन पक्ष महाविकास आघाडीत असून आम्ही एकत्र येऊन ही जागा कोण लढवणार याबाबत निर्णय घेऊ. आताच या विषयावर बोलणे उचित ठरणार नाही. राष्ट्रवादीकडून नगर लोकसभा जागा आम्हीच लढवणार असा दावा केला जातो आहे, असे विचारले असता यावर आ.थोरात म्हणाले, नगर लोकसभेची जागा ही राष्ट्रवादीकडे होतीच म्हणून ते म्हणत असतील. मात्र, जागा वाटपाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. लवकरच बैठक होऊन निर्णय होईल, अनेक गोष्टी पुढे येतील. त्यानंतर त्यावरती बोलणे योग्य ठरेल.