लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचे मतदान शनिवारी दि. १ जून रोजी होत आहे. त्याआधीच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी पंतप्रधानपदाबाबत मोठं विधान केलं आहे. जर इंडिया आघाडीने या निवडणुकीत एनडीएचा पराभव केला तर पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी यांना माझी पहिली पसंती असेल, असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले आहेत. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हा दावा केला आहे.
खरगे म्हणाले की, राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण देशात दौरा केला. तसेच निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात राहुल गांधी यांनी न थांबता अविरत प्रचार केला. फक्त काँग्रेसच नाही तर आघाडीमधील पक्षांसाठीही त्यांनी प्रचार केला होता. त्यामुळे पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी हेच लोकप्रिय पर्याय असतील, असेही खरगे म्हणाले.