झारखंडमध्ये माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर ईडीने कारवाईचा बडगा उगारल्यानंतर आता काँग्रेसच्या आमदारांचीही चौकशी केली जात आहे. काँग्रेसच्या आमदार अंबा प्रसाद यांचीही ईडीद्वारे मनी लाँडरिंग प्रकरणी बुधवारी रात्री चौकशी करण्यात आली. भाजपाचे तिकीट नाकारल्यामुळेच आपली चौकशी होत आहे, असा आरोप अंबा प्रसाद यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना केला. “भाजपानं मला लोकसभेचं तिकीट देऊ केलं होतं, पण मी त्यासाठी नकार दिला. त्यामुळे माझ्याविरोधात ही कारवाई केली जात आहे”, असा आरोप आमदार अंबा प्रसाद यांनी केला.
पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत असताना आमदार अंबा प्रसाद यांनी गंभीर आरोप केले. त्या म्हणाल्या, “भल्या पहाटे ईडीचे अधिकारी माझ्या घरात शिरले. पूर्ण दिवसभर त्यांनी माझा छळ केला. अनेक तास त्यांनी मला एकेठिकाणी उभं ठेवलं. मला भाजपानं हजारीबाग मतदारसंघातून लोकसभेचं तिकीट देऊ केलं होतं, पण मी ते नाकारलं. त्यानंतर माझ्यावर दबावही टाकम्यात आला. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाकडूनही अनेक लोक येत होते, छत्रा मतदारसंघातून मी निवडणूक लढवावी, असेही ते सांगत होते. पण मी त्यावरही काही उत्तर दिले नाही. हजारीबाग मतदारसंघ आमचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे कदाचित आमच्यावर दबाव टाकला जात असेल. आम्ही काँग्रेस पक्षाचे आमदार असल्यामुळे आमच्यावर कारवाई केली जात असावी.”
भाजपाचं तिकीट नाकारलं म्हणून ईडीचा छापा, काँग्रेसच्या महिला आमदाराचा आरोप
- Advertisement -