राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरू असतानाच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे देगलुर विधानसभेचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची चर्चा असून आज ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकांपासून जितेश अंतापुरकर हे पक्षाच्या रडारवर होते, अशातच त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नांदेडच्या देगलूर- बिलोली विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. ते आता लवकरच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. आज सायंकाळी मुंबई येथील भाजपा पक्ष कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे.
जितेश अंतापुरकर हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे जवळचे मानले जातात. अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केला तेव्हा पासून अंतापूरकर हे भाजपाच्या संपर्कात होते. विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंगचा देखील त्यांच्यावर आरोप आहे.त्यांनी भाजपाच्या अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्याने ते त्यांच्या भाजपा पक्ष प्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या.आज ते भाजपामध्ये पक्ष प्रवेश करतील अशी सूत्रांची माहिती आहे.