मुंबई – शिर्डीत देशभरातील लाखो भक्त साईबाबांचा प्रसाद म्हणून अन्नछत्रमध्ये जेवतात, या साईभक्तांना भिकारी म्हणणाऱ्या सुजय विखेंना सत्तेचा माज आहे. त्यांनी सरंजामी मस्तीतून साईभक्तांचा अपमान केला, अशी टीका काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी केली. तसेच मोफत शिक्षण द्यायचे असेल तर सुजय विखेंनी त्यांच्या शैक्षणिक संस्थांमधून द्यावे, त्यासाठी भरघोस डोनेशन आणि शुल्क कशासाठी आकारता, असा सवाल गायकवाड यांनी केला.ं
वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी सुजय विखेंच्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला. गायकवाड म्हणाल्या की, दररोज लाखो साईभक्त शिर्डीत भक्तीभावाने येतात. शिर्डी हे सर्व धर्मियांचे तीर्थक्षेत्र आहे. साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर लाखो भाविक दानपेटीत दानही टाकतात, साई भक्तांच्या देणगीमुळे साई संस्थानकडे दरवर्षी सुमारे 800 कोटी रुपये जमा होतात. या पैशातून साई देवस्थान भक्तांसाठी विविध योजना राबवते, अन्नछत्र हे सुद्धा त्याच पैशातून सुरू आहे, यात सुजय विखेंना अडचण काय?, असा सवाल गायकवाड यांनी केला.
वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या, सुजय विखे आणि त्यांच्या कुटुंबाने वर्षानुवर्षे सत्तेत राहून कमावलेल्या भ्रष्ट पैशातून अन्नछत्र चालवले जात नाही. मोफत जेवण देण्याऐवजी मोफत शिक्षण द्या, असे सुजय विखे सांगत आहेत. मग त्यांनी त्यांच्याच शैक्षणिक संस्थांतून गोरगरीब आणि सामान्य कुटुंबातील मुलांना मोफत शिक्षण द्यावे. लाखो रुपयांचे डोनेशन आणि भरमसाठ शिक्षणशुल्क घेऊन शिक्षणाचा धंदा कशाला मांडला आहे? असा सवाल गायकवाड यांना केली






