काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केरळच्या वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. याच मतदारसंघातून त्यांनी २०१९ साली विजय मिळविला होता. यावेळी उमेदवारी अर्जसह दाखल केलेल्या शपथपत्रात राहुल गांधी यांनी आपल्या संपत्तीविषयी माहिती दिली आहे. या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी ४.३ कोटी रुपये शेअर बाजारात गुंतवले आहेत. तर म्युच्युअल फंडात ३.८१ कोटींची गुंतवणूक आहे. राहुल गांधी यांच्या बँक खात्यात २६.२५ लाख आहेत.
५३ वर्षीय राहुल गांधी यांच्याकडे ५५ हजारांची रोकड आणि २०२२-२३ या आर्थिक वर्षातील एकूण उत्पन्न १.०२ कोटी असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्याकडे १५.२ लाखांचे गोल्ड बॉण्ड आहेत. तसेच त्यांनी राष्ट्रीय बचत योजना (नॅशनल सेविंग्ज स्किम), पोस्ट खात्यात बचत, इन्शुरन्स पॉलिसि आणि इतर मिळून ६१.५२ लाख रुपये गुंतविले आहेत.शपथपत्रातील माहितीनुसार राहुल गांधी यांच्याकडे ४.२ लाख रुपयांचे दागिने आहेत. एकूण जंगम मालमत्ता ९.२४ कोटी आणि ११.१४ कोटींची स्थावर मालमत्ता आहे. दोन्ही मिळून एकूण २० कोटींची संपत्ती असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. याशिवाय त्यांच्यावर ४९.७ लाखांचे कर्जही आहे.