कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर ३१ डिसेंबर रोजी सकाळी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. आपल्या घरातल्या किचनमध्ये राहुल गांधी व सोनिया गांधी काम करत असल्याचं दिसत असून त्यासंदर्भात त्यांच्यात चर्चा होताना दिसत आहे. यावेळी राहुल गांधींनी गप्पांमध्ये भाजपाचाही उल्लेख केल्यानंतर सोनिया गांधींनीही त्यांना तितक्याच मिश्किलपणे दाद दिली!
व्हिडीओमध्ये राहुल गांधी व सोनिया गांधी सायट्रस फ्रूट जॅम बनवत असून प्रियांका गांधींची ही रेसिपी असल्याचं त्यांनी व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. “ही माझ्या बहिणीची रेसिपी आहे. तिनं ही शोधून काढली आणि त्यात सुधारणा केली. मी फक्त आता ती तयार करतो आहे. पण हा माझ्या आईचा फेव्हरेट जॅम आहे”, असं राहुल गांधींनी सांगितलं आहे.
राहुल गांधींनी भाजपाचा उल्लेख करत मिश्किल टिप्पणी केली. “जर भाजपाच्या लोकांना हा जॅम हवा असेल, तर त्यांनाही तो मिळेल. तुला काय वाटतं आई?” असा खोचक प्रश्न त्यांनी सोनिया गांधींना केला. त्यावर सोनिया गांधींनीही तितक्याच मिश्किलपणे “ते तो पुन्हा आपल्याकडे फेकतील” असं म्हणताच दोघांनी दिलखुलास हसून त्यावर दाद दिली. “मग चांगलंच आहे.. आपण तो पुन्हा उचलून घेऊ”, असं म्हणत राहुल गांधींनी त्यावर शेवटी टिप्पणी केली!