छत्रपती संभाजी नगर महामार्गावर पांढरीपूल येथे रविवारी (दि. २८) कंटेनर व दुचाकींच्या अपघातात चार जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे,
अपघातात आई-वडिलांसह दोन भावंडांचा मृत्यू झाला आहे. मृत झालेले सर्वजण पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ येथील रहिवासी आहेत.याबाबत सविस्तर माहिती अशी कि, इमामपूर घाटाच्या तीव्र उतारावरून छत्रपती संभाजी नगरकडे जाणाऱ्या कंटेनरने (क्र. एच. आर. ३८ ए.सी. ५८४८) पुढे चाललेल्या दोन दुचाकींना पाठीमागून चिरडले. हा अपघात सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास झाला.मोपेड दुचाकी (क्र. एम.एच.१६ सी.बी. ५२०३) तसेच दुसरी दुचाकी (क्र. एम. एच.१६ ए.व्ही. १९३१) या गाड्यांना पाठीमागुन जोराची धडक देण्यात आल्याने भीषण अपघात घडला, त्यामध्ये एकाच दुचाकीवरील चार जणांचा मृत्यू झाला आहे.
तर दुसऱ्या दुचाकीवरील भगवान आव्हाड (रा. पांगरमल ता.नगर) हे जखमी झाले आहेत, अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला. दुचाकीवरील अनिल बाळासाहेब पवार (वय २८), सोनाली अनिल पवार (वय २२), माऊली अनिल पवार (वय ११) व एक सहा महिन्यांची मुलगी (सर्व रा. वडगाव सावताळ, टाकळी ढोकेश्वर ता. पारनेर) यांचा मृत्यू झाला आहे.
घटनास्थळी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार मोहम्मद शेख, भगवान वंजारी, ज्ञानेश्वर तांदळे यांनी भेट देऊन वाहतूक सुरळीत केली. दरम्यान पांढरीपुल परिसरात दररोज होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आक्रमक होत आंदोलनाचा इशारा दिला होता.