लाडकी बहीण योजनेचे श्रेय घेण्यावरून महायुतीच्या घटक पक्षांत धुसफूस असल्याचे पडसाद मंत्रिमंडळ बैठकीत उमटले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही ‘देवा भाऊ’ असे फलक झळकले आहेत. यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
ही योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या नावानेच आहे. महायुतीमधील तीनही घटक पक्ष बहिणींचे भाऊ आहेत, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. मात्र यातील मोठा भाऊ कोण? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, मोठा भाऊ कोण, लहान कोण? याच्याशी बहिणींना घेणेदेणे नाही. ओवाळणी स्वरुपात काहीतरी सरकारने दिले, याचे त्यांना समाधान आहे.
अजित पवारांना महायुतीत घेऊन चूक झाली का? असा प्रश्नही फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, आमची चूक वैगरे झालेली नाही. ही युती होणे काळाची गरज होती. त्यांना सेटल व्हायला थोडा वेळ लागेल. पण पुढे जाऊन आम्हाला त्यांची मदतच होईल. द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये अजित पवार म्हणाले की, आम्ही महायुतीत आलो असलो तरी आमची धर्मनिरपेक्ष विचारधारा सोडली नाही. यावरून युतीत दादा गुलाबी झाले, पण भगवे झाले नाहीत, असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर फडणवीस म्हणाले, “अजित पवार काही दिवसांपूर्वी सर्व आमदारांना घेऊन सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी गेले. अजित पवारांना आमचा गुण लागला. पुढेही अजित पवार आणखी बदलल्याचे दिसतली.”