अहिल्यानगर-गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीने एका महिलेच्या घरात मध्यरात्री घुसून त्यांच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले तर दुसर्या एका महिलेचा हात पकडून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना शनिवारी शहरात घडली.
याप्रकरणी पीडित 25 वर्षीय महिलेने शनिवारी रात्री तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून राजू उर्फ गड्डी साहेबराव काते (रा. लालटाकी, अहिल्यानगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी आपल्या पती व मुलांसह हॉलमध्ये झोपले होते. रात्री 1.15 च्या सुमारास घराचा दरवाजा लोटलेला असताना राजू काते याने दरवाजा उघडून घरात प्रवेश केला.
त्यानंतर, फिर्यादीजवळ येऊन तिच्या सोबत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. या घटनेमुळे फिर्यादी जाग्या झाल्या व त्यांनी आरडाओरड केल्यावर राजू पळून गेला. फिर्यादीने या घटनेची माहिती आपल्या पतीस दिली. घराजवळील काही शेजार्यांनीही राजूला पळून जाताना पाहिले. तसेच सकाळी, फिर्यादी घराबाहेर उभी असताना राजूने त्यांना हाताच्या इशार्याने धमकावले व तुला बघून घेतो, अशी धमकी दिली. यामुळे फिर्यादी भीतीने कामावरही जाऊ शकल्या नाहीत.तसेच, फिर्यादीच्या ओळखीच्या महिलेसोबत देखील राजूने अयोग्य वर्तन केले. हात धरून अश्लील शिवीगाळ केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.